ध्यान आणि मातृत्व - आईपण

          प्रत्येक गर्भवती स्त्रीची सर्वजण प्रेमाने खूप काळजी घेत असतात. ती पण आपल्या बाळाची संपूर्ण काळजी घेते. सर्व आई वडिलांची अशी अपेक्षा असते की त्यांच्या बाळाने या ऐहिक जगात जन्म घेऊन प्रवेश करतांना संपूर्ण जीवन आरामात मजेत आणि सुखात जगावे तर अशा भावी मात्यापित्यांनी पाळायच्या या काही सूचक गोष्टी आहेत.


          स्त्रीला ज्याक्षणी समजेल की ती आई होणार आहे, त्या क्षणापासून तिने ध्यान करायला हवे. दररोज कमीत कमी एक तास ध्यान करणे उत्तम, पण जर तिला हे शक्य झाले नाही तर दिवसातून अर्धा अर्धा तास दोन वेळा ध्यान केले तरी चालेल. गर्भधारणेपूर्वी ध्यानाची आवश्यकता नाही का? आहे ! ध्यानाची गरज प्रत्येक माणसाला आहे. जर तिला आधीपासून ध्यानाची सवय नसेल तर तिने किमान आत्तापासून ध्यान करायला सुरवात केली पाहिजे.


          आज लोक इच्छा-अपेक्षांच्या स्वप्नात, अनावश्यक विचारात, स्वार्थीपणे आणि अनारोग्यात, रोगट जीवनात जगतात. ऐहिक सुखाच्या मागे धावण्यात ते त्यांचा वेळ वाया घालवतात. याचा अर्थ असा नाही की आपल्याला काही इच्छा अपेक्षाच नसाव्यात. आपल्या सांसारिक इच्छा व आपल्या वरवरच्या इच्छांचा अनुभव यांच्या शोधात आपण आपल्यातला खरा ’मी’ विसरत असतो.


          आपण आपल्यातला ’मी’-’स्व’-ला विसरल्यामुळे आपण पूर्ण गोंधळलेलं, अशांत, आजारी जीवन जगतो. म्हणून खर्‍या ’मी’ च्या संपर्कात रहाणे आवश्यक आहे. हे आपण करायचे कसे ? ध्यान हा एकच मार्ग आहे ज्याच्या मुळे आपण आपल्यातल्या खर्‍या ’मी’-’स्व’-ला, आपल्या आत्म्याला स्पर्श करू शकतो, अनुभवू शकतो.


          आतल्या ’मी’ चे सत्यस्वरूप ओळखण्यासाठी आपल्याला या बाहेरच्या जगाला विसरायला हवे. एकदा आपण खर्‍या ’मी’ चे सत्यस्वरूप जाणले की, आपले सगळे जग आणि त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल.


          जेव्हा आपण आपल्या आत्म्याच्या संपर्कात नसतो तेव्हा आपले जीवन ताणतणाव, दु:ख आणि आजारपणाने भरलेले असते. याच गोष्टी आपल्या बाळापर्यंत पोहचविल्या जातात. या सर्व नकारात्मक कंपनांचा (निगेटिव्ह व्हायब्रेशनचा) परिणाम, आत असलेल्या बाळावर होतो. अशा नकारात्मक विचारांचा व भावनांचा परिणाम आपल्या बाळावर होऊ नये अशी आपली इच्छा असेल तर ध्यानाचा सराव आपल्याला करायलाच हवा.


          आध्यात्मिक पुस्तके वाचून सकारात्मक विचार जोपासू शकतो. रोज पुस्तकाची दोन दोन पाने वाचली तरी पुरेशी आहेत. अत्याचाराने भरलेली व अनावश्यक भावनांचे व ताणतणावांचे रसभरीत वर्णन करणारी पुस्तके वाचणे टाळावे. या गोष्टींचा सुध्दा बाळावर नको तो परिणाम होतो. टि.व्ही. व सिनेमाचा प्रभाव बाळावर पडू शकतो. मारामारीची दृष्ये मोठया आवाजातील संगीत आणि फक्त भावनांशी खेळणार्‍या मालिका पूर्णपणे टाळायला हव्यात. विनोदी कार्यक्रम, मंद स्वरातील संगीत आणि जीवनातील सौंदर्य दाखवणार्‍या गोष्टींचा बाळावर सकारात्मक परिणाम होईल.


          आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दलही आपण काळजी घ्यायला हवी. आवश्यक असेल तेव्हाच आपण खायला हवे आणि बाळाला खाऊ घालतो आहे असा विचार करून भुकेपेक्षा जास्त खाऊ नये. त्याऐवजी आपण ठराविक वेळेनंतर थोडे थोडे खायला हवे मांसाहार पूर्णपणे टाळायला हवा. जीवंत प्राण्यांना ठार मारणे किंवा दुखापत पोहचविणे हे मोठे पाप आहे. हे माहित असून सुध्दा जर आपण तेच करत राहीलो तर पोटातील बाळ हे सत्य स्विकारणार नाही कारण या ऐहिक जीवनात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी खुप ज्ञान मिळविलेले असते. याच सुमारास आपण खाण्याच्या चांगल्या सवयी लावू शकतो. फळे व फळांचा रस अतिशय आरोग्यदायी आहे. थोडया प्रमाणात सुका मेवा पण खाता येऊ शकतो. कोणताही पदार्थ जास्त खाऊ नये, फक्त आपल्याला मानवेल-पचेल तेवढाच खावा. आपण इतर लोकांबद्दल गप्पा मारू नये किंवा अनावश्यक बोलण्यात वेळ वाया घालवू नये. जर आपण अनावश्यक बोलणे व नकारात्मक विचार टाळले तर अनारोग्य आपल्या जवळपास सुध्दा फिरकणार नाही.


आपण आपली काळजी घेऊ शकणार नाही इतके कोणत्याच कामात स्वत:ला गुंतवून घेऊ नये. कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करणे किंवा जास्त काम करणे टाळायला हवे. आपल्याला शक्य असेल तेवढेच काम करा. स्वत:वर जास्त काम लादून जास्त ताण निर्माण करू नका.


          वर सांगितल्याप्रमाणे जीवन जगणे फार सोपे आहे. एखादी गोष्ट कठीण आहे असा आपण विचार करू नये. रोज केलेले एक तास ध्यान, योग्य गोष्टी नेहमी करण्यासाठी मदत करेल. जेव्हा आपण आपल्या आत्म्याच्या संपर्कात असतो तेव्हा आपण आपले जीवन योग्यप्रकारे व्यतीत करतो. आपल्या सभोवतालची परिस्थिती - वातावरण - सुंदर असायला हवे.


          आपलं मन ताजेतवाने व प्रसन्न ठेवण्यासाठी आपण हसर्‍या बाळांची चित्रे, मन प्रसन्न करणारी निसर्गदृश्ये, इत्यादी बघावीत. भावनाशील, आनंददायी संगीत सुध्दा आपल्याला सुखद वाटेल. आपला आनंद मग बाळापर्यंत पोहचविला जाईल आणि ते पण आनंदी होईल. ते फक्त आईच्या गर्भाशयातच आनंद अनुभवेल असे नाही तर या जगात त्याचा जन्म होईल तेव्हा सुध्दा ते आनंदी असेल.

Go to top