अलौकिक मन

 

मन = जीवन

मन हेतुंनी विणलेले असते, हेतु जीवन परिस्थिती प्रकट करतात.


मन हे बीज आहे, जीवन हे वृक्ष आहे.


मनाच्या निर्मितीच्या बीजातून अंकूर फुटून वाढलेला वृक्ष म्हणजे जीवन.


आपल्या स्वतःच्या हेतुचे इच्छाचे -निर्माते - शिल्पकार आपले आपणच आहोत आणि आपल्या मनाच्या विशिष्ट नमुन्याचे आधार व भरण पोषण करणारे आपणच आहोत. कोणत्याही एका विशिष्ट क्षणी आपण आपल्या मनाचा असलेला नमुना - नकाशा बदलू शकतो व नव्या नमुन्याला जन्म देऊ शकतो.

 

सामाजिक जडणघडण

बालपणी मुलाच्या वाढत्या मनावर आईवडिलांची विचारसरणी व सामाजिक परिस्थिती यांचा तीव्र प्रभाव असतो. तथापि मुलाची वाढ होऊन तारूण्यात प्रवेश होतो तेव्हा मनाच्या विशिष्ट नमुन्याची निवड करण्याची वेळ येते. वयात आलेल्या माणसाच्या जगात वेगवेगळे प्रकार असतात. त्या सर्वातून सर्वोत्तम नमुना निवडणे शहाणपणाचे ठरेल. मानवी मनाचे मूलतः चार मुख्य प्रकार आहेत.


मानवी मनाचे प्रकार
1) संकटमय/विनाशकारी मन
2) नकारात्मक मन
3) सकारात्मक मन
4) अलौकिक मन

 

संकटमय/विनाशकारी मन

समजा एक माणूस मोटार किंवा मोटारसायकल चालवायला नुकताच शिकला असेल आणि तो आपले वाहन शहरात प्रथमच चालवत आहे. जर ती व्यक्ती संकटमय-संकटग्रस्त मनाची असेल तर ती व्यक्ती म्हणेल "मी शहरात प्रथमच गाडी चालवत आहे. मला भीती आहे की माझ्या हातून अपघात होईल." असा विचार करून जर माणसाने गाडी चालविली तर निश्चितच अपघात होईल ! कारण आपल्या विचारांच्या प्रतिमा आपल्या बोलण्यातून आपण पुढे आणत असतो.

 

नकारात्मक मन

आता नकारात्मक मनाचा असलेला माणूस म्हणेल "मी शहरात प्रथमच ड्रायव्हिंग करतो आहे. काय होईल ते मला माहित नाही. न जाणो मला अपघात होईल. कदाचित मला अपघात होणारही नाही. मला माहित नाही." तेव्हा अशा प्रकारचे मन असलेला येणारे संकट कसेबसे टाळेल. पण ती व्यक्ती कोणत्यातरी वादग्रस्त प्रश्नात अडकेल. उदा. चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे, चुकीच्या मार्गाने जाणे. इत्यादि. येथे "संकट" नसेल पण निश्चितच काहीतरी "समस्या" असेल.


संकटमय मनाच्या व नकारात्मक मनाच्या तुलनेतील वेगवेगळया शब्दांच्या अर्थांची कृपया नोंद घ्यावी.


सकारात्मक मन

तिसऱ्या प्रकारच्या व्यक्तीकडे, सकारात्मक मनाच्या व्यक्तीकडे पाहूया. अशी व्यक्ति असे म्हणेल. "मी जरी प्रथमच शहरात गाडी चालवत असलो तरी सर्व काही व्यवस्थित होईल. प्रतिकूल असे काहीही घडणार नाही." ती व्यक्ती शहरात पहिल्यांदा गाडी कार घेऊन जात असेल तरी छान गाडी चालवून सुखरूप परत येईल. निश्चितच तेथे "अपघात" होणार नाही व चुकीच्या गल्लीत घुसणे यासारख्या "समस्याही" येणार नाहीत.


पुन्हा एकदा वेगवेगळया प्रकारच्या मनाच्या वेगवेगळया शब्दांकडे लक्ष द्या. आत्मा उत्क्रांतीच्या वेगवेगळया स्तरावर वेगवेगळया प्रकारच्या मनाच्या अवस्था राखत असतो. सकारात्मक मनाचा आत्मा नकारात्मक मनाच्या आत्म्यापेक्षा व संकटमय मनाच्या आत्म्यापेक्षा अधिक प्रगत असतो.

 

अलौकिक मन-चमत्कारी मन

शेवटचा-अंतिम-चौथ्या प्रकारची व्यक्ती. गुरू (मास्टर) ही चमत्कारी/ अलौकिक मन असलेली व्यक्ती असते. ती व्यक्ती सुध्दा शहरात प्रथमच गाडी चालवत असते तरीही ती व्यक्ती म्हणते, "मी वीस मिनिटात इच्छित स्थळी जाऊन परत येईन." जरी पहिलीच वेळ असली तरी सुध्दा स्वतःसमोर आव्हान ठेवून लक्ष्य निश्चित केले जाते. याला म्हणतात अलौकिक - चमत्कारी मन.


उदा. येशू ख्रिस्ताचे मन किंवा गौतम बुध्दाचे मन. अशा मनाला तुम्ही "सकारात्मक मन" म्हणत नाही ते असते "अलौकिक मन."


आपण नेहमी अलौकिक - चमत्कारी मनाचच लक्ष ठेवायला हवे. गुरू-मास्टरचे ते लक्षण आहे. जीवन आपोआप ध्येयपूर्ती मागे जाते. आपण जसे आपल्यासमोर ध्येय ठेवतो तसे आपल्या जीवनाला विशिष्ट दिशा देत असतो.


आपण जर आपल्या समोर ध्येय ठेवले नाही तर अर्थातच आपले जीवन भरकटत जाईल. परंतु निश्चित धेय ठेवले तर आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळेल आणि जीवन भरकटणार नाही. आपण नेहमीच विशिष्ट प्रकारचे मन किमान सकारात्मक मन राखून जास्तीत जास्त अलौकिक मनाने आपल्या जीवनाला विशिष्ट दिशा द्यायला हवी.


जर आपल्याला आपले जीवन अलौकिक घडवायचे असेल तर अलौकिक मनाची मशागत करायला हवी व अलौकिक ध्येय समोर ठेवायला हवे. जर आपले संकटग्रस्त मन असेल तर जीवन संकटमय होईल. मन जर नकारात्मक असेल तर नकारात्मक आयुष्य जगावे लागेल. आपले सकारात्मक मन असेल तर सकारात्मक जीवन लाभेल.अलौकिक मनाची जोपासना केली तर जीवनही अलौकिक होईल.

 

जसे माणसाचे मन तसे त्याचे जीवन !
ध्यान अलौकिक मन देते!

 

भरपूर ध्यानानेच फक्त आपल्याला अलौकिक मन मिळते. आपण जर ध्यान केले नाही तर जास्तीत जास्त आपण सकारात्मक मनातच अडकून राहू. सकारात्मक मनापासून अलौकिक मनापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला भरपूर ध्यान करणे आवश्यक आहे. जितक्या लवकर आपण भरपूर ध्यान करू तितके ते आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरेल.

- ब्रह्मर्षि पत्रीजी

Go to top